मुंबई: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. तसेच, सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सत्तारांवर सडकून टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते महिलांविषयी काहीही बोलतात. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्याव. अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे.
संबंधित बातमी- 'भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणतो...' 'त्या' वक्तव्यावर अब्दुल सत्तारांची माफी
त्या पुढे म्हणाल्या की, शिंदे गटाचे तीन मंत्री सध्या आमचे रडारवर आहेत. रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तर गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने या तिघांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.