ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - पैसे कमावण्यासाठी माणूस काहीही करू शकतो, सरळ मार्गाने पैसे न मिळाल्या, तो वाममार्गाला लागतो. मुंबईत एका चोराने अवघ्या २ वर्षांत तब्बल ४० लाख रुपये किमतीच्या चपला चोरल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून हे वृत्त ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.
माटुंगा पोलिसांनी नुकतीच इब्राहिम शेख याला घरफोडीच्या आरोपाखाली अटक केली असून त्याने इतर विविध गुन्हे कबूल केले आहेत. त्यातील एक गुन्हा म्हणजे चप्पलचोरी...शेख याने सुमारे २ वर्षे विविध ठिकाणांहून चपला चोरल्या असून त्याची किंमत तब्बल ४० लाखांच्या घरात जाते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम दररोज सुमारे ८ ते १० चपलांचे जोड चोरी करून दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध नळबाजार येथे विकत असे. अशा प्रकारे आत्तापर्यंत त्याने तब्बल ४० लाख रूपयांच्या चपला चोरल्या आहेत.
सुमारे तीन वर्षांपूर्वी माटुंगा येथील एका घरफोडीच्या घटनेत इब्राहिम शेखचा चेहरा तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तेव्हापासून पोलिस शेख याचा शोध घेत होते. काही वर्ष तो सेकन्ड हॅण्ड मोबाईलही विकत असे मात्र त्याला त्यात बराच तोटा झाला. त्यानंतर शेखने ब्रँडेड चपला व बूट चोरण्याचा धंदा सुरू केला आणि पाहता पाहता तो लखपती बनला. अखेर तीन वर्षांनी पोलिसांना शेखला पकडण्यात यश आले आणि त्या गुन्ह्यांसह चप्पलचोरीच्या या अजब गुन्ह्याचीही उकल झाली.