- जिजाबराव वाघ, चाळीसगाव
काहींच्या घराची वाताहत झालेली... काहींना आई-वडिलांनी दूर केलेले... नापिकीमुळे काहींची शिक्षणवाट थांबलेली... काहींच्या वाट्याला आलेलं अनाथपण...दोन वेळच्या जेवणाची भ्रांत...तीन ते अकरा वर्षे वयोगटातील अशा २० मुलांचे हे भरकटलेले आयुष्य वारकरी संप्रदायाच्या वाटेवर आणून एका दाम्पत्याने त्यांच्यासाठी मायेची पंढरी उभारली आहे. कृष्णा महाराज, त्यांच्या पत्नी सुनीता आणि मुलगा राम. हे त्रिकोनी कुटुंब येथील शिवाजी चौकात राहते. कृष्णा महाराज यांच्या घरात वारकरी पंथाची परंपरा. त्यांचे वडील मोतीराम महाराज यांनी शतकापूर्वी चाळीसगाव पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाची पहिली वीट ठेवली. तीन वर्षांपूर्वी या दाम्पत्याने २० मुलांसाठी पूर्णत: निवासी स्वरूपाची व्यवस्था करून त्यांना अध्यात्म आणि शालेय शिक्षणाच्या सूत्रात बांधले. शहरात दर दिवशी ६० घरी जाऊन ही मुले माधुकरी मागतात. त्यात एक भाकरी किंवा दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी दिली जाते. ३० घरे सकाळी व ३० घरे सायंकाळी असा दिनक्रम आहे. स्वत: कृष्णा महाराज यांनी माधुकरी मागून आळंदीत शिक्षण पूर्ण केले असल्याने त्याद्वारे परोपकाराची भावना वाढीस लागते, अशी त्यांची धारणा आहे. केवळ २० टक्के वारकरी शिक्षण देऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातही आणले आहे. काकडा आरती, वारकरी पाठ , अभंग, कीर्तनाचा अध्याय याबरोबरच त्यांना तबला, मृदुंग, पेटी व गायनही शिकवले जाते. वारकरी संप्रदायाचे आचरण असणाऱ्या कुटुंबीयांकडून मुले माधुकरी घेतात. पुढे मुले वाढली तर जागेचा प्रश्न निर्माण होईल. जागा उपलब्ध झाल्यास अधिक मुलांना मोफत वारकरी शिक्षण देण्याचा मानस आहे. - कृष्णा महाराज, चाळीसगाव