पुणे : नाला वळवून त्यावर बांधकाम करणाऱ्या व पुन्हा पालिकेवरच न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला अभय योजनेतून दंडमाफी देण्याचा प्रताप पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला असल्याचे मंगळवारी सर्वसाधारण सभेत उघड झाले. महापौर प्रशांत जगताप यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे व पुढील सभेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.खराडी येथे हा प्रकार झाला आहे. तिथे सर्व्हे क्रमांक ६४ व ७३ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारती आहेत. त्याच्या जागेतून नैसर्गिक नाला जात होता. त्याने हा नाला पालिकेच्या संमतीशिवाय वळवला. पालिकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती होती; मात्र काहीही कारवाई करण्यात आली नाही; तसेच बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी नियम डावलून अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यात आल्या. या संबंधीची माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी प्रशासनाला विचारली होती. सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरांच्या वेळेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला व प्रशासनाला धारेवर धरले.याबाबत बरीच ओरड सुरू झाल्यानंतर प्रशासनाने त्या बांधकाम व्यावसायिकाला ५ कोटी ८० लाख ९९ हजार ५९२ रुपये दंड केला. त्याविरोधात त्याने पालिकेवर न्यायालयात दावा दाखल केला. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने त्याला अभय योजनेचा फायदा दिला व दंड कमी केला. असे करताना त्यासंबंधी सर्वसाधारण सभेला कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असे सर्वसाधारण सभेतील प्रश्नोत्तरांमधून उघड झाले.हा सर्व प्रकार बेकायदेशीर व आर्थिक फायद्यासाठी करण्यात आला आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोप बागवे यांनी केला. महापौर प्रशांत जगताप यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांना दिले. (प्रतिनिधी)
नाला वळवणाऱ्याला ‘अभय’
By admin | Published: August 24, 2016 1:03 AM