यवतमाळ - ट्युशनला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झालेल्या सहाव्या इयत्तेतील विद्यार्थ्याचा शनिवारी मृतदेह सापडला. त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार यवतमाळामधील भोसा रोड स्थित सुरजनगर भागात उघडकीस आला.
अभिजित दीपक टेकाम (१२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहाव्या इयत्तेचा विद्यार्थी आहे. शुक्रवार १३ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता तो ट्युशनसाठी घरुन गेला. परंतु बराच वेळ होऊनही परत आला नाही. कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. दरम्यान शनिवारी सकाळी डेहनकर ले-आऊट भागातील सुरजनगर येथील एका पडिक जमिनीत त्याचा मृतदेहच आढळून आला. मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने अंगावर दगड टाकून अभिजितचा खून करण्यात आल्याचा कयास वडगाव रोड पोलिसांना व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.
अभिजित हा केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. ज्या सायकलवरून ट्युशनला जात होता ती सायकलही अद्याप सापडलेली नाही. त्याचे वडील हे वीज महावितरण कंपनीत ऑपरेटर पदावर कार्यरत आहेत. कळंब तालुक्याच्या वेणी कोठा येथील ३३ उपकेंद्रावर त्यांची नेमणूक आहे. अभिजितच्या मृत्यूमागील रहस्य कायम आहे. त्याचा खून कुणी व कशासाठी केला, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.