Baramati Assembly Elections :बारामती विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघ चर्चेचा विषय ठरणार आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात मुख्य लढत होणार आहे. अशातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये अभिजीत बिचुकले यांनी उडी घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका लढवल्यानंतर आता अभिजीत बिचुकले बारामतीध्ये आपलं नशीब आजमवणार आहेत.
बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवत आहे. बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत होणार आहे. त्यातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही उडी घेतली आहे. अभिजीत बिचुकले बारामतीमधून विधानसभा निवडणुकीत उतरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
याआधी अभिजीत बिचुकले यांनी मुंबईतील वरळी, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता पुन्हा बिचुकले यांनी बारामतीमधून उभं राहण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
दुसरीकडे, कसबा पोट निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना ४७ मते मिळाली होती. तर लोकसभा निवडणुकीतही अभिजीत बिचुकले यांनी कल्याण आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांना १८०८ तर साताऱ्यात त्यांना १३९५ मते मिळाली होती.
दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढवल्या आहेत पण ते एकामध्येही विजयी झाले नाहीत. त्यांना एकाही निवडणुकीमध्ये यश मिळवता आले नाही.