अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पुण्यात सुरु झालेले समोरच्याला गोळ्या घालून संपविण्याचे लोन आता राज्यभर पसरू लागले आहे. ठिकठिकाणी व्यापारी, गुंड, राजकीय नेत्यांना अशाप्रकार संपविण्यात येत आहे. अशातच अभिषेक घोसाळकरांचे वडील, माजी आमदार विनोद घोसाळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.
विनोद घोसाळकर यांच्या कुटुंबावर, अभिषेकवर घाणेरडे आरोप करण्यात येत आहेत. यामुळे उद्विग्न होत विनोद घोसाळकर यांनी एक निवेदन जारी केले आहे. माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने हत्या करण्यात आली आहे. हा माझ्या कुटुंबावर आघात आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असले खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत, असा इशारा घोसाळकर यांनी दिला आहे.
घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह गोष्टी पसरविल्या जात आहेत. यामुळे घोसाळकर यांनी हे निवेदन जारी केले आहे. मी 1982 पासून सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली”, असे घोसाळकर यांनी म्हटले आहे.
आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा शब्दांत विनोद घोसाळकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.