यदु जोशी - मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत 15 दिवसांपासून एकमेकांशी बोलायलादेखील तयार नाहीत, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे तर काँग्रेस पक्ष आपले उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त आहे.
जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शेवटची बैठक 2क् ऑगस्ट रोजी दिल्लीत झाली होती. त्या बैठकीला ए.के.अँटोनी, अहमद पटेल हे ज्येष्ठ काँग्रेस नेते तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतर्फे उपस्थित होते.
जागावाटपाबाबत पुन्हा चर्चेसाठी काँग्रेसकडे तगादा लावायचा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की भाजपा आणि शिवसेनेची युती होते की नाही यावर आम्ही नजर ठेवून आहोत. ते वेगळे लढले तर आम्हीही वेगळे लढण्याचा विचार करु. मात्र स्वबळावर लढावे, असे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे.
मात्र, जागावाटपाबाबत राष्ट्रवादीने घाई न करण्यामागे वेगळे कारण असल्याची चर्चा आहे. आतापासूनच जागावाटप झाले,काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढणार हे ठरले तर राष्ट्रवादी सोडून भाजपा-शिवसेनेत जाणा:यांची संख्या वाढेल, ही भीती यामागे असल्याचे बोलले जाते. गेले काही दिवस राष्ट्रवादीतील अनेक लहानमोठे नेते पक्षाला रामराम ठोकत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्या मानाने काँग्रेस सोडून जाणा:या नेत्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या पातळीवर काँग्रेसमध्ये तितकेसे चिंतेचे वातावरण नाही. राष्ट्रवादीच्या मागणीसमोर न झुकण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली दिसते. 144 जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच नाही. दबावासमोर झुकण्यापेक्षा स्वबळावर लढलेले बरे असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा सूर आहे. राष्ट्रवादीच्या कोटय़ातील 114 जागांसाठी काँग्रेसच्या इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा सूर अधिक गडद झाला आहे. युतीचे काय होते ते पाहून आघाडीचे ठरवू, असे सूचक उद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच्या पत्र परिषदेत काढले होते.
आम्हाला 144 जागा हव्या आहेत आणि तसा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या बाजूने आघाडीबाबत बोलण्यासारखे काही नाही. काँग्रेसच्या प्रतिसादाची आम्हाला प्रतीक्षा आहे.
- नवाब मलिक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते
जागा वाटपाचा निर्णय दिल्लीतच होईल असे राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगत होते. आता चर्चेचा चेंडू दोन्ही पक्षांच्या दृष्टीने दिल्लीच्या कोर्टात असताना राज्यातील त्यांच्या नेत्यांनी बोलण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही. - सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते.