पंकज रोडेकर,
ठाणे- महिला रिक्षा ‘अबोली’ रंगाची असावी, यावर शिक्कामोर्तब झाल्यावर ठाण्यातील १५६ महिलांपैकी ९२ जणांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क साधला. नोंदणीपत्र मिळवून ठाणेकरांना सुखकारक आणि सुरक्षित रिक्षेची सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे लवकर अबोली रंगाची रिक्षा ठाण्यात धावताना पाहायला मिळणार आहे. उर्वरित महिलांनी लवकरात लवकर नोंदणीपत्र घ्यावे, असे आवाहन ठाणे आरटीओने केले आहे.राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत २०१६ मध्ये एक लाख नवीन परमिटवाटप कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये शैक्षणिक अटीला पूर्णविराम देत महिलांना पाच टक्के आरक्षण दिले. त्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्रासाठी ३५ हजार ६२८ परवान्यांची लॉटरी जानेवारी २०१६ मध्ये काढली. यामध्ये पाच टक्क्यांप्रमाणे महिलांसाठी १ हजार ७८१ परवान्यांचा समावेश आहे. या लॉटरीमध्ये एकूण ४६५ महिलांनी अर्ज केल्यामुळे या सर्व महिलांना विजेता म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाण्यातील १५६ महिलांचा समावेश आहे.दरम्यान, लॉटरी विजेत्यांची परीक्षाही घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना तत्काळ आरटीओ विभागाकडून इरादापत्र आणि परमिटचे वाटप करण्यात आले. परंतु, महिला रिक्षाचा रंग निश्चित होत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली होती. त्यातच काही रिक्षा युनियनने रंगाला विरोध के ल्याने अखेर याबाबत हरकती मागवण्यात आल्या. या सर्व प्रकारांत तीन ते चार महिने गेले. अखेर, राज्य परिवहन विभागाने जून महिन्यात महिला रिक्षा अबोली रंगाचीच असावी, यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर, ठाण्यातील महिला-चालक-मालकांनी आरटीओमध्ये धाव घेऊन नोंदणीपत्र मिळवले. आतापर्यंत १५६ पैकी ९२ जण महिलांनी आरटीओ कार्यालयात येऊन रिक्षा नोंदणीपत्र घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे आरटीओ यशस्वीमहिला रिक्षा विशिष्ट रंगाची असावी, यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन सेवेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. त्यामुळे महिला रिक्षाला अबोली रंग मिळाला.