- विश्वास पाटीलकोल्हापूर : गावांना विकासाचे स्वप्न दाखवून राज्य सरकार प्राधिकरणाची घोषणा करीत असले तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने राज्यभरातील सहाही शहरांत त्याबाबत अनास्था आहे. हद्दवाढ नको म्हणून लोकांचा विरोध झाला की प्राधिकरण पुढे केले जाते; पण तिथेही लोकांच्या वाट्याला भ्रमनिरासच येत आहे. त्यामुळे सगळीकडेच ‘नको ते प्राधिकरण’ अशी भावना लोकांत आहे.कोल्हापूर शहराची हद्दवाढ प्रस्तावित होती. त्यासाठी शहरातून सातत्याने दबाव होता. सध्या महापालिकेत काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता आहे. त्यांनी हद्दवाढीचा आग्रह धरला होता. किमान १७ गावांचा प्रस्ताव होता; परंतु शहरवासीयच नागरी सुविधा मिळत नाहीत म्हणून ओरड करतात आणि आमच्या वाट्याला काय सोईसुविधा येणार, या भीतीतून लोकांनी हद्दवाढीस विरोध केला; म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरसाठीही प्राधिकरणाची घोषणा केली. त्यामध्ये ४२ गावांचा समावेश केला; परंतु स्थापना होऊन एक वर्ष होऊन गेले तरी प्राधिकरणासाठी पुरेसे कार्यालय नाही. कर्मचारी नाहीत. निधीचा तर पत्ताच नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने यापूर्वी जिथे प्राधिकरण स्थापन झाले त्या नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी-चिंचवड व पुणे प्राधिकरणांची स्थिती काय आहे याचा शोध घेतला; तर त्यामध्ये प्राधिकरणाबाबत सगळीकडेच ओरड असल्याचे दिसूून आले.शासनाने प्राधिकरण स्थापन झाल्याची घोषणा केल्यावर पुन्हा त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. कोल्हापूरप्रमाणेच किमान चार ठिकाणी लोकांच्या मनांत प्रचंड संभ्रम आहे; परंतु त्याचा विचार सरकार करायला तयार नाही. खुल्या जागा विकून त्यातून पैसा उभारला जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लोकांच्या मनात जी मूळ भीती आहे की आपल्या जमिनी काढून घेतल्या जातील, तिला दुजोरा मिळत आहे. कोल्हापुरात हद्दवाढ नको म्हणून प्राधिकरण झाले; परंतु इतर ठिकाणी लोकांची मागणी नसतानाच त्याची घोषणा केली आहे. नागपूरला तर त्याचे कार्यक्षेत्र १२५ किलोमीटरपर्यंतचे आहे. या गावांचा विकासाचा कोणताही रोडमॅप प्राधिकरणाकडे नाही. गावांमध्ये तर जमिनी एन. ए. करून त्या प्लॉट पाडून विकणारी यंत्रणाच सक्रिय आहे. त्यामुळे गावांची अनियंत्रित वाढ होत आहे. त्यावर उपाय म्हणून तज्ज्ञांकडून नियोजन करून या गावांचा विकास करू, असे सरकार म्हणते; परंतु करीत मात्र काहीच नाही, असा अनुभव आहे. (समाप्त)गावांची वाढसध्या शहरांशेजारील तसेच इतरही गावांचा विकास होताना नीट नियोजन होत नाही. शहराला लागून असलेल्या गावांमध्ये तर जमिनी एन. ए. करून त्या प्लॉट पाडून विकणारी यंत्रणाच सक्रिय आहे. त्यामुळे गावांची अनियंत्रित वाढ होत आहे.- प्राधिकरण(भ्रम आणि वास्तव)
विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या प्राधिकरणाबाबत अनास्थाच; निधी नाही, रोडमॅप नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 11:05 PM