मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 'ईडी'ने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उतरले असतानाच दुसरीकडे त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी मात्र पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची दुहेरी भूमिका समोर आली असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईचा निषेध करून एकप्रकारे शरद पवारांची पाठराखण केली आहे. शरद पवार हे शिखर बँकेचे कधीही संचालक नव्हते तर ते या घोटाळ्यात कसे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी यावेळी उपस्थित केला.
तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी मात्र पवारांवर टीका केली आहे. जाणत्या राजाला 'ईडी'ची नोटीस आली, मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पाळला, अशी टीका सुजात यांनी केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत पवारांबद्दल दुहेरी भूमिका असल्याचे बोलले जात आहे. मात्र सुजात यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.
'मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पाळला' ही टीका पवारांवर नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केली होती. सत्तेत असलेल्या भाजपकडून विरोधातील पक्षांच्या नेत्यांवर खोट्या कारवाई करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुजात आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी नेते )