डिप्पी वाकाणी
नाशिक, दि. २४ - चारवर्षांपूर्वी मुंबईतील गाजलेल्या वकिल पल्लवी पूरकायस्था हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला सज्जाद मोगल फरार झाला आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार पॅरोलवर सुटून बाहेर आलेला सज्जाद पुन्हा तुरुंगात परतलाच नसल्याचे समोर आले आहे. वडाळयाच्या भक्ती पार्कमध्ये १६ व्या मजल्यावर रहाणा-या पल्लवीची नऊ ऑगस्टला २०१२ रोजी सज्जादने अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती.
या हत्ये विरोधात समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने जलदगती न्यायालयात हा खटला चालवला. सज्जादला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्याला नाशिक कारागृहात पाठवले. सज्जादने नऊ ऑगस्टच्या रात्री पल्लवीच्या फ्लॅटचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर त्याने पल्लवीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करुन तिची हत्या केली होती.
सज्जाद मूळचा काश्मिरचा असून, तो पाकिस्तानात पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला काश्मिरमध्ये अटक झाली होती. सज्जादने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पॅरोलसाठी अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी त्याचा पॅरोल मंजूर केल्यानंतर तो एप्रिलच्या अखेरीस तीस दिवसांसाठी बाहेर आला पण त्यानंतर तो तुरुंगात परतलाच नाही. या प्रकरणी नाशिक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या निमित्ताने तुरुंग प्रशासनाच्या कारभारातील त्रुटी समोर आल्या आहेत. वडाळ्यातील एका उच्चभ्रू सोसाटीत राहणा-या पल्लवीचा मृतदेह आढळला होता. या घरात पल्लवी तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सज्जादला अटक केली होती.
खून, घुसखोरी व विनयभंगाचे आरोप लावण्यात आले होते. पल्लवीवर सज्जादची पहिल्यापासून वाईट नजर होती़ त्या रात्री ती घरात एकटीच होती़ त्या वेळी सज्जादने जाणीवपूर्वक लाइट बंद केल्या व घरात घुसला़ त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ पण तिने प्रतिकार केल्याने सज्जादने तिचा खून केला होता.