लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी पालिकेचे कोविड उपचार केंद्र , प्रभागीय कर कार्यालय व नागरी सुविधा केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी काही कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.
पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शनिवारी उपायुक्त संजय शिंदे यांच्यासह महापालिकेच्या प्रभाग समिती क्र . ४ मधील कनकिया भागातील कर विभागाच्या कार्यालयास , रामदेव पार्क भागातील समृद्धी कोविड उपचार केंद्र आणि आयडियल पार्क येथील वैद्यकीय व नागरी सुविधा केंद्रास अचानक पणे भेटी दिल्या . अचानक दिलेल्या भेटीत त्या ठिकाणी चालणारे कामकाज, उपलब्ध कर्मचारी - अधिकारी, कोविड उपचार केंद्रातील रुग्णांना दिला जाणाऱ्या जेवणाचा दर्जा व सेवा आदींचा आढावा घेतला.
त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या नोंदवह्या तपासल्या . त्या मध्ये अनेक कर्मचारी कामावर हजार नसल्याचे आढळून आले . जे कर्मचारी गैर हजार आहेत त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने आणि सहा.आयुक्त गोडसे यांना दिले.
पाहणी दरम्यान उपचार केंद्र, नागरी सुविधा केंद्र व कार्यालयात आवश्यक त्याठिकाणी स्वच्छता, नीटनेटकेपणा ठेवण्याच्या सूचना आयुक्त यांनी केल्या. रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवण व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णांकरीता जेवण व्यवस्था आणखी सुरळीत व्हावी व जेवणाच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता न ठेवण्याचे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत अश्या रुग्णांचे १० दिवसाचे विलगिकरण झाल्यानंतर त्यांना सोडण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली .