मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाला काही तास उलटले नसतानाच, आता नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. त्याचे कारण म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी झालेल्या पक्षाच्या मुलाखतीला जगताप गैरहजर असल्याचे पहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आमदार जगताप हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. स्वत: जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला होता. मात्र गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या झालेल्या मुलाखतीला जगताप हे गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे जगताप हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असूनही या विधानसभा मतदारसंघात खासदार सुजय विखेंनी ५३ हजार १२२ मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे राजकरणातील पुढील अंदाज लक्षात घेत जगताप राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा मोठ्याप्रमाणात सुरु आहेत.
हे ही वाचा पक्षांतरामुळे वैभव पिचडांपासून दुरावणार आदिवासी मते !
त्यातच अकोले मतदार संघाचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. पिचड हे सद्या मुंबईत आहे. तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे समजले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. मात्र जगताप आणि पिचड यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास,अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप एकमेव आमदार राष्ट्रवादीचे राहतील हे विशेष.