"...म्हणून मी माफी मागितली होती"; निलंबनाच्या निर्णयावर अबू आझमींनी मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:42 IST2025-03-05T15:38:59+5:302025-03-05T15:42:09+5:30
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईनंतर आझमींनी त्यांची भूमिका मांडली.

"...म्हणून मी माफी मागितली होती"; निलंबनाच्या निर्णयावर अबू आझमींनी मांडली भूमिका
औरंगजेबाचे गोडवे गाणारे विधान केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाल्यानंतर सरकारकडून तसा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचे निलंबनही करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमी यांनी एका व्हिडीओतून त्यांची भूमिका मांडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
औरंगेजबाबद्दल विधान केल्यामुळे अबू आझमी हे वादात सापडले. हिवाळी अधिवेशनात त्यांच्या विधानाचे पडसाद उमटले. त्यांना सभागृहातून निलंबित करण्याच्या मागणीसाठी विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाले होते. अखेर बुधवारी (५ मार्च) त्यांना निलंबित करण्यात आले.
...तरीही मला निलंबित केलं गेलं -आझमी
निलंबनाच्या कारवाईनंतर अबू आझमी यांनी भाष्य केले आहे. मी काही चुकीचं बोललेलो नाहीये, पण कामकाज चालावं म्हणून विधान मागे घेतले, असे ते म्हणाले.
"सभागृहाचं कामकाज चालावं म्हणून मी जे बोललो होतो, ते मागे घेण्याची भूमिका घेतली. मी काही चुकीचं तर बोललो नव्हतो. पण, तरीही हा जो गोंधळ सुरू आहे, सभागृहाचे कामकाज रोखले जात आहे. सभागृह चालावं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही काम व्हावं. मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक काम थांबलेली आहेत. त्यामुळे मी जे विधिमंडळाबाहेर बोललो होतो, ते मागे घेतले होते. पण, त्यानंतरही मला निलंबित करण्यात आले", अशी नाराजी आझमींनी या निर्णयाबद्दल व्यक्त केली.
अबू आझमी किती काळासाठी निलंबित करण्यात आलं?
आमदार अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, त्यांना किती काळासाठी निलंबित करायचं, याचा निर्णय झालेला नाही. त्यांच्या निलंबनाचा कार्यकाळ ठरवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ती समिती याबद्दलचा निर्णय घेणार आहे.
तूर्तास या अधिवेशन काळात अबू आझमी यांच्या विधानसभेच्या परिसरात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.