महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २१ नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सध्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.
अशातच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना इशारा दिला आहे. समाजवादी पार्टीसोबत चर्चा केल्याशिवाय उमेदवारांची यादी जाहीर करू नये. तसे झाल्यास समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पार्टीचा अपमान करू नये. आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पार्टीला फक्त एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ ५ मिनिटं चर्चा झाली. समाजवादी पार्टी हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये, असे अबू आझमी म्हणाले.
तसेच, जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर समाजवादी पार्टीला इतर कोणत्याही आघाडीसोबत म्हणजेच तिसरी आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर किंवा महाराष्ट्रात अनेक जागांवर स्वबळावर निवडणूक लढवेल. त्यानंतर जर मुस्लिम मतांची विभागणी झाली तर त्याला समाजवादी पार्टी नव्हे तर महाविकास आघाडी जबाबदार असेल, असे अबू आझमी यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी केली असून समाजवादी पार्टीने पाच जागांसाठी तयारी पूर्ण केली आहे, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान, अबू आझमी यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना या पाच जागांची नावंही सांगितली आहेत. मानखुर्द शिवाजीनगर गोवंडी, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, मालेगाव आणि धुळे या जागांसाठी समाजवादी पार्टीने तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, मुंबईतील अणुशक्ती नगर, वर्सोवा, औरंगाबाद पूर्व, बाळापूर, भायखळा अशा एकूण १२ मुस्लिमबहुल जागांची मागणी समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे केली आहे. अबू आझमी म्हणाले की, १८ आणि १९ ऑक्टोबरला अखिलेश यादव दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते मालेगाव आणि दुळे यांना भेट देणार आहेत. समाजवादी पार्टीला जागा न दिल्यास किंवा संमती न दिल्यास अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करेल.