Abu Azmi on Holi: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी औरंगजेबाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळून आला होता. यामुळे त्यांना विधानसभेच्या अधिवेशनातूनही निलंबित करण्यात आले होते. आता आझमी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उद्या (14 मार्च 2025) धुळबड आहे आणि यासंदर्भात अबू आझमींनी मुस्लिम समुदायाला भावनिक आवाहन केले आहे.
मीडियाशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, 'आपल्या देशात गंगा-यमुना परंपरा आहे. काही लोक गैरकृत्य करतील. आपल्याला उत्सवांचे राजकारण करायचे नाही. उद्या धुळवड साजरी करणाऱ्या प्रत्येकाला मी विनंती करतो की, त्याने उत्साहाने धुळवड साजरी करावी, कोणत्याही मुस्लिम बांधवांवर संमतीशिवाय रंग टाकू नये. नाईलाजाने घरात नमाज अदा करता येऊ शकते, मात्र रमजानच्या महिन्यात मशिदीत नमाज अदा करणे आवश्यक आहे.'
'त्यामुळेच मुस्लिम बांधवांनी मशिदीत जाऊन नमाज पडावा. जर एखाद्या मुस्लिम बांधवाच्या अंगावर रंग पडला तरी, त्याने भांडण करू नये. भांडण तंटे न करता रहावे. हा महिना बंधुत्वाचा आणि क्षमा करण्याचा महिना आहे. जरी एखादा रंग पडला तरी तंटे करू नका. अशी विनंती करतो. काही लोक मुद्दाम मशिदीवर रंग टाकतील, त्यामुळे मशिदी झाकल्या जात असतील,' असेही अबू आझमी यावेळी म्हणाले .
उत्तर प्रदेशात होळीच्या विशेष सूचनायंदा रमझानच्या शुक्रवार आणि धुळवड एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील काही ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुस्लिम समाजाला विशेष सुचना दिल्या आहेत. होळी असल्यामुळे नमाज अदा करण्यासाठी उशीरा घराबाहेर पडावे, कोणाच्या अंगावर रंग पडला, तर त्याने तो आनंदाने स्वीकारावा. रंग पडू द्यायचा नसेल, तर घरातून बाहेर पडू नये, घरातच नमाज अदा करावी, अशाप्रकारच्या सूचना योगी सरकारने केल्या आहेत. याशिवाय, रंग पडला तर जातीय हिंसाचार घडू शकतो, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मशिदींवर कापड झाकले जात आहे.