समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, "भाजप जिकेंल म्हणून आम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 07:50 PM2024-10-29T19:50:03+5:302024-10-29T19:54:14+5:30

समाजवादी पक्षाच्या जागांवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर अबू आझमींनी प्रतिक्रिया दिली.

Abu Azmi reacted after the constituent parties of the MVA announced their candidates for the Samajwadi Party seats | समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, "भाजप जिकेंल म्हणून आम्ही..."

समाजवादी पक्षाच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाचे उमेदवार; अबू आझमी म्हणाले, "भाजप जिकेंल म्हणून आम्ही..."

Samajwadi Party on MVA : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ उलटल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र असे असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचा काही जागांवर प्रश्न सुटला नाही. त्यामुळे आता या जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या समाजवादी पक्षाच्या विरोधातही काँग्रेस आणि ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीत अनेक जागांवरुन घटक पक्षांमध्ये वाद निर्माण झाले होते. अनेक चर्चांनंतरही बऱ्याच जागांचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे घटक पक्षांनी आपले उमेदवार त्या त्या मतदारसंघात उभे केले आहेत. अशातच महाविकास आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पक्षाच्या विरोधातही मित्र पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. या सगळ्यावर अबू आझमी यांनी भाष्य केलं.

"आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत. आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्यामुळे आम्ही देखील तोच पर्याय स्विकारला आहे. भिवंडीतून आमचे दोन आमदार निवडून आले तर हा एक चमत्कार असेल. आम्हाला नाशिकप्रमाणेच भिवंडी सुधारायची आहे. आम्हाला भिवंडीचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्हाला तिथल्या दोन्ही जागा जिंकायच्या आहेत. आमची जनतेला विनंती आहे की आम्हाला विजयी करा," असं अबू आझमी म्हणाले.

"मी महाविकास आघाडीकडे २५ जागांची मागणी केली होती. पण आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितले की जर आपण २५ जागा लढवल्या तर मते विभागली जातील आणि भाजप जिकेंल. त्यांनी असे करु नका सांगितले. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार आहोत. पण आम्ही अशा ठिकाणी निवडणूक लढवत आहोत जेथून जिंकू शकू," असेही अबू आझमी म्हणाले.

महाराष्ट्रात सपाने निवडणूक लढवण्यासाठी १२ मुस्लिमबहुल जागा निश्चित केल्या होत्या. मात्र, नंतर सपाने पाच जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य केले. यातील मानखुर्द, शिवाजीनगर आणि भिवंडी पूर्व या जागांवर गेल्या निवडणुकीत सपाने विजय मिळवला होता. त्यामुळे  अबू आझमी यांनी धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य जागा मागितल्या होत्या. मात्र अबू आझमी यांनी मागितलेल्या पाचपैकी तीन जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने रोजी त्यांचे उमेदवार जाहीर केले.

दुसरीकडे, मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ठाकरे गटाकडून राजेंद्र वाघमारे रिंगणात उतरले आहेत. ठाकरे गटाचे राजेंद्र वाघमारे यांनी ठाकरे गट आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता अबू आझमी यांच्यासमोर  नवाब मलिक, सुरेश पाटील, राजेंद्र वाघमारे अशा सर्वच पक्षांचे आव्हान असणार आहे.

Web Title: Abu Azmi reacted after the constituent parties of the MVA announced their candidates for the Samajwadi Party seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.