Abu Azmi News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधातील हिंसेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा. तसेच मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी यावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका योग्यच असल्याचे मत मांडले आहे.
आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल. त्या याचिकेमागील षड्यंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे षड्यंत्र आहे. हे भाजपाचे षड्यंत्र आहे. हे लोक भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचे की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या अबू आझमी यांना राज ठाकरे आणि मनसेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला.
याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे
मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. एका समाजाचे लोक जे खूप कष्ट करतात, जेव्हा कोरोना काळ होता, सर्व काळजीत होते, उत्तर भारतीयांसाठी वाहने पाठवत होते, पैसे पाठवत होते. त्यांनाच शिव्या दिल्या जात आहेत आणि सरकार शांतपणे सगळे पाहत आहे. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा उत्तर प्रदेशातून नेत्यांना बोलावता, त्या उत्तर भारतातील नेत्यांच्या माध्यमातून उत्तर भारतीय समाजाची मते घेण्याचा प्रयत्न करता आणि उत्तर भारतीयांचा अपमान होत असताना बोलतही नाहीत. ज्यांनी ही याचिका केली आहे, ते योग्यच आहे. मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये फूट पाडणाऱ्या अशा लोकांवर निर्बंध आणलेच पाहिजेत, असे अबू आझमी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना संधी दिलेली आहे. मुंबई ही मराठी भाषिकांचीही आहेच. मराठी बोलले पाहिजे हे ठीक आहे. दक्षिण भारतातील किंवा उत्तर भारतातील युवावर्ग चांगल्या पद्धतीने मराठीत बोलतात. बँकेत जाऊन तुम्ही म्हणाल की, हे सगळे करा, तर ही भूमिका अयोग्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी इकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे केंद्रीय नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे.