विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. या वादानंतर विधानसभेतून आझमी यांना निलंबित केले. दरम्यान, आता आज आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची स्तुती केली आहे.
“आरक्षणाची लढाई फायनल मॅच असणार, आता आम्ही मुंबई बघणार, हिसका दाखवणार”: मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अबू आझमी यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मराठीत ट्विट करत अबू आझमी यांनी लिहिले की, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शहादत दिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली.
काही दिवसापूर्वी अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले होते. यात त्यांनी औरंगजेबाला एक चांगला राजा म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी त्यांच्या विधानावर जोरदार टीका केली आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला.
अबू आझमी काय म्हणाले होते?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले होते की, "मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. त्या काळातील सत्ता संघर्ष धार्मिक नव्हता तर राजकीय होता."
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसे अनेक मुस्लिम होते तसेच औरंगजेबाच्या सैन्यातही अनेक हिंदू होते. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये युद्ध झाले असा दावा करणारे खोटे बोलत आहेत, असंही अबू आझमी म्हणाले होते.
काही दिवसांनी माफी मागितली होती
राज्यभरात आझमी यांच्या विधानाचा विरोध झाल्यानंतर अबू आझमी यांनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरुद्ध बोलण्याचा विचारही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते."मी इतका महान नाहीये, माझे शब्दाचा विपर्यास केला आहे. मी औरंगजेबबद्दल तेच बोललो आहे जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले आहे, असंही अबू आझमी म्हणाले होते.