Kirit Somaiya Abu Azmi, ECI: समाजवादी पक्षाचे नेते आणि शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबू आझमी यांच्या ऐन विधानसभा निडवणुकीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अबू आझमी यांच्या भाषणातील विधानासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना तत्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अबू आझमींचे मालेगावात भाषण, सोमय्यांची तक्रार
समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मालेगावात झालेल्या सभेत भाषण केले होते. या भाषणात अबू आझमींनी केलेल्या विधानासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली.
धर्माच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन अबू आझमींनी केले असल्याची तक्रार सोमय्यांनी आयोगाकडे केली.
अबू आझमी यांनी धुळ्यातील मालेगाव येथे झालेल्या सभेत "आम्ही २ आमदार आहोत. आम्हाला ६ ते ८ आमदार हवे आहेत आणि अखिलेश भाई, ज्या दिवशी ८ आमदार होतील, कुणीही मायचा लाल नसेल, जो मुस्लिमांवर अन्याय करेल. हा माझा वादा आहे. मी या समाजासाठी माझा जीवही देऊ शकतो."
याच विधानासंदर्भात किरीट सोमय्यांनी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली होती.
निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
आचार संहिता भंग केल्यासंदर्भातील या तक्रारीच केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांना याचसंदर्भात तत्काळ वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अबू आझमी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.