सातारा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेली अटक सत्तेच्या गैरवापरातूनच झाल्याचे दिसत आहे, असा आरोप करीत याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच योग्य ती भूमिका घेऊ,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पवार यांनी सोमवारी त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन अण्णांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. ‘भुजबळ प्रकरणाचा तपास सुरू असून, सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल,’ असेही पवार म्हणाले. ‘नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गजर करून भाजप केंद्रात सत्तेत आले; परंतु गेल्या दोन वर्षांच्या कारभारानंतर आणि बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांच्या वलयाला आहोटी लागल्याचे दिसत आहे. सध्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट होईल,’ असेही त्यांनी सांगितले. नितीशकुमार हे पंतप्रधानासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत शरद पवारांनी यापूर्वी व्यक्त केले होते, त्याकडे लक्ष वेधले असता ‘मी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही. तसेच नितीशकुमार यांच्याशीही बोललो नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत बाकीच्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता नितीशकुमार यांच्यामध्ये दिसते,’ असे ते म्हणाले. ‘राज्यात एका भागातच दुष्काळ नसून विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. सरकारला गांभीर्य नसून मुख्यमंत्र्यांनी एखादा विभागाचा प्रमुख म्हणून नाही तर राज्याचा प्रमुख म्हणून काम करावे,’ असा टोलाही त्यांनी हाणला. दुष्काळाच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही पवार म्हणाले. (प्रतिनिधी)
अटक सत्तेच्या गैरवापरातून
By admin | Published: May 10, 2016 3:10 AM