नवी मुंबई : शहरामध्ये पोलीस, प्रेस याबरोबर आता नगरसेवक पदाचा लागो कारच्या दर्शनी भागात लावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. महापालिकेचे बोधचिन्ह व त्यावर ‘नगरसेवक’ असे लिहून ते स्टिकर चिटकविले की वाहतूक पोलीस कारवाई करीत नाहीत, टोलमधूनही सूट मिळविता येत असल्याने सद्य:स्थितीत ५०० पेक्षा जास्त वाहनांवर अशी स्टिकर्स दिसू लागली आहेत. नवी मुंबईत वाहनतळांची संख्या कमी असल्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. रोडवर गाडी उभी केली की तत्काळ पोलीस नो पार्किंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे सांगून कारवाई करीत आहेत. याशिवाय सिग्नल तोडला, सीटबेल्ट न वापरल्यास तत्काळ कारवाई केली जाते. कारवाई टाळण्यासाठी पळवाटा शोधल्या जात आहेत. वाहनांवर पोलीस व प्रेस असे लिहिणाऱ्या वाहनांची संख्या काही हजार झाली आहे. प्रेस व पोलीस असे लिहिले की कारवाई केली जात नाही. आता या यादीमध्ये नगरसेवकपदाचा लागो वापरणाऱ्या वाहनांची भर पडली आहे. नगरसेवक प्रतिष्ठा म्हणून त्यांच्या कारच्या पुढील व मागील काचेवर पालिकेचा लोगो व त्यावर ‘नगरसेवक, नवी मुंबई महानगरपालिका’ असा उल्लेख केलेले स्टिकर लावले जाते. पूर्वी फक्त नगरसेवक त्याचा वापर करीत होते, परंतु आता नगरसेवकांचे कार्यकर्तेही त्यांच्या कारवर हा लोगो वापरू लागले आहेत. महापालिकेचा लोगो व नगरसेवक लिहिलेले स्टिकर कोणत्या वाहनावर वापरले जाते, याविषयी विचारणा केली असता पालिकेने कोणालाही अशी स्टिकर्स दिलेली नसल्याची माहिती मिळाली. नगरसेवक परस्पर अशाप्रकारचे लोगो तयार करून लावत आहेत. नगरसेवकांचे कार्यकर्तेही आता या लोगोचा वापर करू लागले आहेत. नगरसेवक लिहिले की नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तरीही दुर्लक्ष केले जाते. टोलनाक्यावरूनही पैसे न देता जाता येत असल्यानेच या लोगोचा वापर केला जात आहे. त्यावर कारवाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
‘नगरसेवक’च्या लोगोचा गैरवापर
By admin | Published: April 28, 2016 3:04 AM