विक्रमगड : शंभर टक्के आदिवासी समाज असलेल्या डोल्हारी गावाने लग्न समारंभात दारु, ताडी, माडी, कपड्याचे-भांड्याचे मान-पान, मांसाहारी भोजन आदी अनिष्ट-रूढी परंपरा बंद करण्याचा ठराव गावमेळाव्यात केला आहे. त्यामुळे या पुढे डोल्हारी गावातील सर्व विवाहसोहळे अत्यंत साधेपणे होतील. या वेळी गावातील पारंपारीक सांस्कृतिक रुढींना उजाळा देण्यात आला. या वेळी नागरिकांनी तारपा नृत्य, तुर नाच, ढोल नाच, तांबडनाच सादर केले. तसेच या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय नोकरीस लागलेल्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच गावाचा एकोपा व्हावा म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्र म करण्यात आले. या वेळीच आदिवासी समाज का मागे पडला? यावर चिंतन करण्यात आले. त्यात लग्न सोहळ्यातील भरमसाठ उधळपट्टीमुळेच अनेक आदिवासी कुंटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावातील नागरिकांच्या सर्वानुमते या उधळपट्टीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. साखरपुडा, मुलगा, अथवा मुलगी बघणे, हळद हे सोहळे देखील अत्यंत साधे पणाने करण्याचे ठरविण्यात आले. हे सोहळे कौटुंबिक स्वरुपाचे आहेत. त्याला दोन कुटुंबातील व्यक्तीच उपस्थित असायच्या शिरा, पोहे अथवा चहा, कॉफी यावरच ते साजरे व्हायचे परंतु नंतर असलेल्या अथवा नसलेल्या संपत्तीच्या प्रदर्शनाच्या हव्यासातून त्यावर उधळपट्टी होऊ लागली. ती थांबलीच पाहिजे, असे ठरले. यातून होणाऱ्या बचतीचा पैसा नवदाम्पत्याच्या शिक्षण अथवा संसारासाठी वापरावा असेही यावेळी ठरविण्यात आले. आदिवासी समाजात कुणाचे लग्न करायचे म्हटले की वधू-वर पक्षाच्या कुटुंबियाचे कंबरडेच मोडते. हळदी-कुंकू, वधूवराला पहायला जाणे, मांडव समारंभ, लग्न असा २-३ दिवसांचा कार्यक्रम असतो. खाणाऱ्या-पिणाऱ्यांची चांगलीच चंगळ असते. मांसाहाराच्या बेताशिवाय विवाह पूर्णच होत नाही. याशिवाय तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी विशेष सोय करावी लागते. त्यासाठी दारु, ताडी, माडी याचा वापर होतो. त्याच्या प्राशनाने लग्नात वाद-विवाद, भांडणे या मुळे विघ्ने येतात. लग्न कार्यात नातेवाईकांचा मानपान, आहेर करताकरता कुटुंब कर्जाच्या विळख्यात सापडतात. हे ओळखून हा निर्णय घेतला गेला.>आमच्या गावात लग्न समारंभात अनिष्ट चाली, रूढींना फाटा देण्याचा निर्णय आम्ही गाव मेळाव्यात एकमुखाने घेतला. विशेषत: साखरपुडा व लग्न समारंभातील अनावश्यक होणारी उधळण, दारु, ताडी, साड्या मान-पान देण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.- किरण गहला, ग्रामस्थआमच्या आदिवासी समाजात लग्नाच्या अवास्तव खर्चामुळे अनेक आदिवासी कुटुंबे कर्जाच्या खाईत खितपत आहेत. त्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीच्या शिक्षणावर होतो. तरु णांनी याची दखल घेऊन हे नवे पाऊल टाकले आहे. आम्ही आमच्या गावापासून सुरवात केली आहे. आता इतरांनी त्याचे अनुकरण करावे. - राजा गहला, जेष्ठ ग्रामस्थ
लग्नातील अनिष्ट प्रथांना तिलांजली
By admin | Published: March 03, 2017 3:10 AM