मुंबई : सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहे. २४ डिसेंबर रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर अधिवेशनाचे उद्घाटन करतील. २६ डिसेंबरच्या समारोप कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.सुमारे ३ हजार विद्यार्थी प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या अधिवेशनात नवा विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रित असावा, शासनाने स्वस्त व स्वावलंबी शिक्षण द्यावे, दुष्काळाचे समूळ उच्चाटन करावे, राज्याच्या सांस्कृतिक व सामाजिक बदलात लोकसहभाग वाढावा असे प्रस्ताव मांडण्यात येतील. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना वेळी ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यात जन, जंगल, जमीन, वनवासींसाठी काम करणाऱ्या ‘वयम’चे मिलिंद थत्ते यांना ‘सामाजिक प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येईल. तर क्रीडा प्रशिक्षणात शिवकालीन पारंपरिक खेळांचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या कोल्हापूरच्या संदीप जाधव यांना ‘शैक्षणिक प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविले जाईल. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. (प्रतिनिधी)शोभायात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन : २५ डिसेंबरला अभाविपचे राज्यातून ३ हजार विद्यार्थी प्रतिनिधी शिवाजी पार्कपासून प्रभादेवीच्या साने गुरुजी मैदानापर्यंत शोभायात्रा काढतील. या वेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व प्रतिनिधी सामील होणार असल्याचे संघटनेने सांगितले.
अभाविपचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन
By admin | Published: December 19, 2015 2:52 AM