मुंबई : खासगी बस कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि प्रवासी वाढवण्यासाठी एसटी महामंडळाने जास्तीत जास्त एसी बसेस चालवण्यावर भर दिला आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यात राज्यातील ग्रामीण भागातही एसी बसेस चालवण्याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. येत्या काही महिन्यात एसटीच्या ताफ्यात २००० एसी बसेस दाखल करण्यात येणार आहेत. राज्यात एसटीच्या ताफ्यात जवळपास १८ हजार बसेस आहेत. १२१ एसी बस असून मुंबई, ठाणे ते पुणे, तसेच औरंगाबादसह अन्य मार्गावरही या बस धावतात. त्याची संख्या वाढवतानाच प्रवाशांना चांगली सेवा कशी देता येईल याकडे एसटी महामंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले की, ग्रामिण भागात शटल सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता एसी बसेसचा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर १,५०० एसी बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातही धावणार ‘एसी बस’
By admin | Published: April 25, 2017 2:59 AM