सुशांत मोरे, मुंबईकोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठा गाजावाजा करत मध्य रेल्वेने एसी डबल डेकर ट्रेन सुरु केली. मात्र प्रिमियिम ट्रेनची सुरुवात करणाऱ्या या ट्रेनला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर या ट्रेनचा प्रवास थंडावला. सध्या चर्चेत नसणारी डबल डेकर ट्रेन लोअर परेल कारशेडमध्ये पाठवण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र ती ट्रेन आपल्याकडे नसल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. तर डबल डेकर ट्रेन कारशेडमध्येच असल्याचे मध्य रेल्वे ठासून सांगत आहे.कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर ट्रेन नसल्यामुळे मध्य रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेन सुरु करण्यात आली. बारा डब्यांची असलेली ही ट्रेन गणेशोत्सवकाळात प्रिमियिम ट्रेन म्हणून सुरु करण्यात आली. मात्र मागणीनुसार या ट्रेनचे भाडे अवाच्यासव्वा वाढत असल्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांकडून ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवात या ट्रेन २0 फेऱ्या चालवण्यात आल्या. अल्प प्रतिसादामुळे त्यानंतर एसी डबल डेकर थेट दिवाळीत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ती प्रिमियिम म्हणून न चालवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मात्र या ट्रेनच्या फेऱ्या जवळपास ८0 टक्के रिकाम्याच धावत असल्याने त्याला प्रतिसाद देण्यात यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले. त्यानंतर मात्र या ट्रेनला धावण्याचा मुहूर्त मिळाला नाही आणि या ट्रेनचा प्रवास थंडावला.महागडी असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्नही उद्भवल्याने आणि मध्य रेल्वेकडे एसी डबल डेकरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी जागा नसल्याने हा प्रश्न सोडवायचा कसा असा मुख्य प्रश्नच मध्य रेल्वेला पडला. त्यामुळे ही ट्रेन पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कारशेडमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. काही दिवसांपूर्वी ही ट्रेन कारशेडमध्ये पाठवण्यातही आल्याचे सांगण्यात येते. मात्र आपल्याकडे एसी डबल डेकर नसल्याचे पश्चिम रेल्वेचे अधिकारी सातत्याने सांगत आहे.
एसी डबल डेकर ट्रेन बेपत्ता
By admin | Published: December 18, 2014 5:30 AM