लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बहुप्रतीक्षित वातानुकूलित (एसी) लोकलची चाचणी पश्चिम रेल्वेवर यशस्वीपणे सुरू आहे. पावसाळ््याच्या दिवसांमध्ये एसी लोकलची चाचणी पूर्ण होईल. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव एसी लोकल दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चर्चगेट ते बोरीवली या मार्गावर एसी लोकल चालवण्यात येणार आहे.वातानुकूलित लोकलची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहे. मात्र, एसी लोकल प्रत्यक्षात धावण्यासाठी तूर्तास तरी वेळ असल्याचे सूत्रांनी सांगितले. एसी लोकल प्रत्यक्षात धावण्यासाठी विविध चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यापूर्वी विविध विभागांची परवानगी आवश्यक आहे. त्याचबरोबर, एसी लोकल चालवताना प्रवासी सुरक्षिततेची नियमावली अधिक काटेकोरपणे पाळण्यात यावी, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. परिणामी, एसी लोकल पावसाळ्यानंतर प्रवासी सेवेत आणणर असल्याचे सूत्रांनी सांगितले. एसी लोकलमध्ये महिलांसाठी राखीव डबा असेल. मुंबईकरांना एसी लोकल ही ‘दिवाळी भेट’ ठरणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. एसी लोकलच्या तिकिटाबाबत दर सध्या तरी निश्चित करण्यात आले नाहीत. मात्र, एसी लोकलचे तिकीट दर हे बदलते असण्याची शक्यता आहे. शिवाय एसी लोकलमध्ये प्रवेशासाठी रांग लावणे बंधनकारक आहे. विनातिकीट प्रवाशांसोबत होणारे वाद टाळण्यासाठी एसी लोकलमध्ये तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.बुलेट ट्रेन २०२२ साली : मुंबई-अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२२ साली धावण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेनला ९० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ट्रेनसाठी मुंबईतील जागेचा प्रश्न सुटला असून वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जागा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समंती दिली आहे. बीकेसीतील बुलेट ट्रेनच्या जागी एमएमआरडीए आंतरराष्ट्रीय सेवा केंद्रासाठी प्रयत्नशील होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे बुलेट ट्रेनच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. बुलेट ट्रेनला सुरुवात झाल्यावर बीकेसीचा चेहरामोहरा बदलेल. - ए.के. मित्तल, अध्यक्ष, रेल्वे बोर्ड
एसी लोकलला आता दिवाळीचा मुहूर्त
By admin | Published: June 06, 2017 6:00 AM