मुंबई : मुंबईकर प्रतीक्षा करत असलेली एसी (वातानुकूलित) लोकल एप्रिल महिन्यात दाखल होणार आहे. अनेक चाचण्या झाल्यानंतर प्रत्यक्षात एसी लोकल सेवेत दाखल होईल. या लोकलचे भाडे हे दिल्ली मेट्रोप्रमाणे आकारावे, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी दिली. रेल्वेच्या चैन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) बनत असलेली एसी लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर दाखल होणार होती. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एसी लोकल मध्य रेल्वे मार्गावर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६ एप्रिलपासून ट्रान्स हार्बर मार्गावर या लोकलची चाचणी करण्याचा विचार केला जात आहे. या ट्रेनची चाचणी केल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत साधारपणे दोन महिन्यांत दाखल होईल. या लोकलचे भाडे प्रवाशांना परवडणारे असावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी दिल्ली मेट्रोप्रमाणे भाडे आकारणी करण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. सध्या दिल्ली मेट्रोचे किमान भाडे दोन किलोमीटरसाठी आठ रुपये आणि ४४ किलोमीटरसाठी ३0 रुपये आहे. दिल्ली मेट्रोकडून भाडेवाढीचा नवीन प्रस्तावही तयार करण्यात आला असून यात १0 रुपयापासून ते ५0 रुपयांपर्यंत हे भाडे ठरविण्यात आले आहे. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना विचारले असता, एसी लोकलचे भाडे जास्त ठेवल्यास एसी लोकलला प्रवासी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोप्रमाणे भाडे आकारणी करण्याचा विचार करत आहोत आणि तशी मागणी रेल्वे बोर्डाकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)- सध्या मुंबई मेट्रोचे भाडे हे ४0 रुपयांपर्यंत आहे. यात ११0 रुपयांपर्यंत भाडेवाढ मिळावी अशी मागणी मुंबई मेट्रोकडून केली जात आहे. मात्र यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने भाडे अद्याप वाढलेले नाही. मुंबई मेट्रोचे भाडे हे एसी लोकल प्रवाशांना परवडणार नाही, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, एसी लोकलचे भाडे कमी ठेवल्यास लोकलच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही निघणे कठीण होईल, असेही मत रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत.
एसी लोकलचे भाडे दिल्ली मेट्रोप्रमाणे
By admin | Published: April 01, 2016 1:49 AM