प्रथम कारशेडमध्ये चाचण्या : १२ चाचण्या होणार
मुंबई : सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचणीला अखेर ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला कारशेडमध्ये चाचण्या घेण्यात येणार असून अशा १२ चाचण्या होतील. ३ नोव्हेंबर रोजी चाचणी न झाल्यास ४ नोव्हेंबरपासून चाचण्या करण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीमध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये ५४ कोटी रुपये किमतीची एसी लोकल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर ती ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यावर मध्य रेल्वेकडून विचार करण्यात आला. मात्र या लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली. आता एसी लोकलच्या सॉफ्टवेअरची समस्या सोडवल्यानंतर गाडीच्या चाचण्या ३ नोव्हेंबरपासून करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडथळे आल्यास ही चाचणी ४ नोव्हेंबरपासून केली जाईल. प्रथम या लोकलच्या कारशेडमध्ये १२ चाचण्या होतील. यामध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी, एसीची चाचणी, त्याचबरोबर शंटिंगच्या (मागे-पुढे लोकल सरकवणे) चाचणीबरोबरच अन्य चाचण्याही होतील. जवळपास तीन आठवडे चाचण्या केल्यानंतर ही लोकल कारशेडबाहेर पडेल आणि त्यानंतर प्रत्यक्षात उपनगरीय ट्रॅकवर बारा ते पंधरा आठवडे लोकलची चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)