मुंबई : मध्य रेल्वेत सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचणीला अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारपासून प्रथम कुर्ला कारशेडमध्ये चाचण्यांना सुरुवात केली जाईल. अशा १९ विविध चाचण्या दोन ते तीन आठवडे घेण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर ती ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर चालविण्यावर मध्य रेल्वेकडून विचार करण्यात आला. मात्र या लोकलच्या सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्ये उभी आहे. या समस्या सोडवल्यानंतर त्याच्या चाचणीला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिवसाला एक ते दोन चाचण्या घेण्यात येतील. कारशेडमध्ये चाचणी पार पडल्यावर लोकल चाचणीसाठी बाहेर काढली जाईल आणि प्रत्यक्षात उपनगरीय मार्गावर बारा आठवडे चाचणी होईल. एसी लोकल मध्य किंवा पश्चिम रेल्वेवर धावू शकते का याची चाचपणी दोन्ही रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)