मुंबई : वैमानिकांच्या प्रशिक्षणासंदर्भात निर्धारित नियमांचे पालन न केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अकासा एअर कंपनीला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २० मे रोजी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गुरगाव येथील कार्यालयाचे अचानक परीक्षण केले होते. त्या दरम्यान कंपनीने वैमानिक प्रशिक्षणासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याचे आढळले होते. त्यानंतर डीजीसीएने कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. तसेच कंपनीला त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी संधी दिली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर अखेर १७ ऑक्टोबर रोजी डीजीसीएने कंपनीवर दंडात्मक कारवाई केली आहे. डीजीसीएने पारित केलेले आदेश आपल्याला प्राप्त झाले असून या संदर्भात आपण काम करत असल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.
अकासा विमान कंपनीला ३० लाख रूपयांचा दंड; नियमांचे पालन न केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:14 PM