लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पद व अधिकाराचा गैरवापर करुन लाचखोरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) न्यायालयात योग्य आरोपपत्र दाखल करण्यासाठी अनुभवी विधि सल्लागाराची आवश्यकता आहे. इच्छुक वकिलांनी त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. १५) अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.एसीबीचे विधी सल्लागाराची नियुक्तीसाठी कायद्याची सद्यस्थिती व विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या खटल्याविषयी सखोल ज्ञान आणि कमीतकमी दहा वर्षे वकिलीचा अनुभव असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवाराची मानधन तत्त्वावर ११ महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. हा कार्यकाळ जास्तीजास्त आणखी दोनवेळा वाढवता येणार आहे. दर महिन्याला मानधन आणि दूरध्वनी व प्रवास भत्त्यासह एकूण २८ हजार रुपये उमेदवाराला दिले जाणार आहेत. विधि सल्लागाराकडे कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या सर्व खटल्यातील कागदपत्रांची तपासणी करणे, त्यासंबंधी अधिकाऱ्यांना योग्य सल्ला देणे आणि प्रलंबित खटले त्वरित मार्गी लागण्यासाठी सरकारी वकीलांकडे पाठपुरावा करणे, अशी प्रमुख जबाबदारी असणार आहे.
एसीबीला हवा विधी सल्लागार!
By admin | Published: July 13, 2017 5:05 AM