लाचखोरांवर बसणार चाप नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोरांच्या मुसक्या बांधण्यासाठी पुन्हा एक पाऊल टाकले आहे. आता लाचखोरांविरुद्धची तक्रार किंवा माहिती मोबाईलच्या माध्यमातूनही स्वीकारली जाणार आहे. त्यासाठी एसीबीतर्फे लवकरच ‘मोबाईल अॅप’ सुरू केले जाणार आहे. एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यात लाचखोरांच्या मुसक्या बांधण्याची धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. पारदर्शी कारभारामुळे दीक्षित यांची पोलीस दलात स्वच्छ आणि वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्यामुळे लाचखोरांमध्ये दहशत निर्माण करण्यात एसीबीला यश मिळाले आहे. त्यांनी एसीबीची टोल फ्री हेल्पलाईन (१०६४) सुरू करून भ्रष्टाचाऱ्यांना वेसण घालण्याचे प्रयत्न चालविले. आता मोबाईल अॅप सुरू करून भ्रष्टाचाऱ्यांना घेरण्याची कल्पना दीक्षित यांनी प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे लवकरच मोबाईलधारकांना भ्रष्टाचाऱ्यांची सचित्र माहितीसुद्धा एसीबीला पाठवता येऊ शकणार आहे. (प्रतिनिधी)
एसीबीचे मोबाईल अॅप
By admin | Published: December 12, 2014 12:34 AM