उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी, हॉटेल आदी ठिकाणांवर एसीबीची धाड पडली आहे. आज सकाळी एसीबीच्या २० अधिकाऱ्यांचे पथक आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची चौकशी सुरु आहे.
साळवी यांच्या मुळ घरी, सध्याच्या निवासस्थानी आणि हॉटेलवर रत्नागिरी आणि रायगडचे पथक पोहोचले आहे. या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश आल्याचे सांगितले जात आहे.
या कारवाईवर साळवी यांच्या कुटुंबातील सदस्याने माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घराचे माप घ्यायला आले होते. त्यांच्यानंतर आता एसीबीचे अधिकारी आले आहेत. हे अधिकारी घरातील वस्तू, कपडे, भांडी आदींचे मोजमाप करत आहेत.
एसीबीच्या कारवाईवर राजन साळवींची प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याने आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत हे जनतेला माहिती आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. हे अधिकारी कालच रत्नागिरीत दाखल झाले होते. मी तुरुंगात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे साळवी म्हणआले. तसेच चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे असे साळवी म्हणाले आहेत.