मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक विजय कांबळे सोमवारी सेवानिवृत्त होत असून, त्यांची धुरा पोलीस गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक सतीश माथुर यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याने, पोलीस वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आहे.दरम्यान, मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा दर्जा पदोन्नत करून दत्ता पडसलगीकर यांना डीजीचे प्रमोशन द्यावे लागणार आहे, त्यांच्यासह पुण्याचे पोलीस आयुक्त के.के.पाठक यांना बढती देऊन राज्य सरकार डीजीचे रिक्त पद भरणार का? तसेच पाठक यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पाठक यांना जेमतेम एक महिन्याचा अवधी असून, ३१ मार्चला निवृत्त होत आहेत.विजय कांबळे हे १९८० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, गेल्या पाच महिन्यांपासून एसीबीचे महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. प्रवीण दीक्षित यांच्या काळात गुन्हा दाखल झालेल्या जलसंपदा, महाराष्ट्र सदन व सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यांचा तपास कांबळे यांच्या कार्यकाळात बहुतांशी पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या पुत्र व पुुतण्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्याच्या पोलीस प्रमुखानंतर एसीबीचे महासंचालक पद महत्त्वाचे मानले जात असल्याने, त्यांची धुरा कोणाकडे सोपविले जाते, याबाबत उत्सुकता आहे. ‘हाउसिंग’चे सतीश माथुर व ‘होमगार्ड’चे राकेश मारिया त्यासाठी पात्र आहेत. दरम्यान, विद्यमान ५ महासंचालकानंतर सेवेत ज्येष्ठ असलेल्या दत्ता पडसलगीकर यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती होऊन २९ दिवस उलटूनही अद्याप त्यांना ‘डीजी’ म्हणून पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यांच्याच १९८४ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या के.के.पाठक हेही कांबळे यांच्या रिटायरमेंटनंतर बढतीसाठी पात्र ठरतात. मात्र, त्यासाठी पडसलगीकर यांचे आयुक्तपदही ‘अपग्रेड’ करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
एसीबीचे विजय कांबळे आज निवृत्त होणार
By admin | Published: February 29, 2016 3:44 AM