लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अनेक ठिकाणी फुटून खड्डे पडल्याने अपघातांच्या धोक्यामध्ये वाढ झाली आहे.भारतातील पहिला जलदगती महामार्ग संबोधल्या जाणाऱ्या या महामार्गावर योग्य पद्धतीने देखभाल दुरुस्तीची कामे होत नाहीत. या मार्गाची अवस्था अगदी सर्वसाधारण रस्त्यासारखी झाली आहे. युती शासनाच्या काळात २००० साली या ९४ किमी अंतराच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, महामार्गावर अनेक ठिकाणी सदोष बांधणीमुळे वेगात वाहने थडथड करत धावतात. अनेक ठिकाणी महामार्ग वर-खाली झाला आहे. काही ठिकाणी विशेषत: घाट क्षेत्रातील किमी ४२ व ४३ दरम्यान दोन ते तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचला असल्याने वेगात आलेली वाहने या ठिकाणांवर आदळतात. याच परिसरात रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. दोन सिमेंट पॅचमध्ये अंतर वाढल्याने वाहनांचे टायर कापले जाण्याची शक्यता वाढली आहे. घाट क्षेत्रात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या परिसरात रस्ता तेलकट व निसरडा झाला आहे. मुंबईकडे जाताना खंडाळा एक्झिट, तसेच अमृतांजन परिसरात उतारावर वाहने ब्रेक मारल्यानंतर घसरत जाऊन उलटण्याचे प्रकार वाढले आहेत. पावसाळ्यात या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने देखभाल-दुरुस्तीची कामे पाहणाऱ्या आयआरबी कंपनीने तातडीने या मार्गाची पाहणी करून महामार्गावर पडलेले खड्डे तातडीने भरून घ्यावेत. तसेच घाटक्षेत्रात तेलकट झालेल्या मार्गावर नवीन पॅच बसवावेत, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. (वार्ताहर)>आडोशी बोगदा : मार्ग, साइडपट्ट्यात पडले अंतरमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या पुणे बाजूकडील मार्गिकेचा साइडपट्टा आडोशी बोगद्याजवळ खचला आहे. यामुळे सिमेंटचा मार्ग व साइडपट्टा यामध्ये फुटभराचे अंतर निर्माण झाले आहे. घाट क्षेत्रात सतत वाहतूककोंडी असलेल्या या ठिकाणी अपघाताची मोठी घटना घडू शकते. याकरिता तातडीने हा साइडपट्टा भरून घेऊन तो मार्गिकेला समांतर करून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यांमुळे ‘द्रुतगती’ धोकादायक
By admin | Published: June 09, 2016 2:15 AM