नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. खारघर हिरानंदानी चौकाजवळील खड्डे रविवारी पेव्हर ब्लॉक बसवून बुजविण्यात आले. ठेकेदार कामे करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. महामार्गावरील खड्डे व रखडलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. महामार्गाची समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार व सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ठेकेदारामुळेच महामार्गाची स्थिती बिकट झाल्याचे सर्वांनीच निदर्शनास आणून दिले. प्रवाशांची गैरसोय व अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च दुरुस्तीची कामे करण्याची तयारी दर्शविली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली आहे. खारघर हिरानंदानी चौकाजवळ मोठे खड्डे पडल्यामुळे व रुंदीकरणाचे कामही अर्धवट राहिल्याने वारंवार वाहतूककोंडी होत होती. तेथील वाहतूक अधिकारी प्रवीण पांडे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनीही अनेक वेळा पाठपुरावा केला होता.खारघरमधील खड्डे बुजविण्याचे व दुरुस्तीचे काम रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. रोडवर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहे. पेव्हर ब्लॉकमुळे पावसाळ्यात येथील समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचेही आभार मानले असून, कळंबोली ते वाशीपर्यंत सर्वच ठिकाणी अशाप्रकारे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. >हिरानंदानी चौकाजवळ पेव्हर ब्लॉक बसविल्यामुळे येथील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. यासाठी पाठपुरावा केलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी व प्रत्यक्ष काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार. उर्वरित कामेही वेगाने करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. - गुरूनाथ गायकर, माजी उपसरपंच, खारघर.
सायन-पनवेल महामार्गावरील दुरूस्तीच्या कामाला अखेर मिळाली गती
By admin | Published: July 10, 2017 3:13 AM