मुंबई – राष्ट्रवादी विरोधात राहणार नाही हे आम्हाला आधीपासून माहिती होते. २०१४ मध्येही त्यांनी प्रयत्न केले होते. एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. ज्यांनी उठाव केले त्याचे काही ना काही मिळवण्याचा उद्देश आहे. आमदारांना जो शब्द दिलाय तो पूर्ण होईल. एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना आश्वासन दिलंय असं सांगत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीवर भाष्य केले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आमच्याकडे १७२ संख्याबळ होते. परंतु राजकारणात एखादा विरोधी गट सोबत येत असेल तर त्यांना घेणे गरजेचे असते. तीच नीती भाजपाने अवलंबली. शरद पवारांचे खंदे समर्थक असलेले सोबत आलेत. राष्ट्रवादी येईल माहिती होते पण इतक्या लवकर येईल वाटलं नाही. अजित पवार गटाला सत्तेत सहभागी केल्यानं आमच्या लोकांना जी पदे मिळणार होती ती कमी झाली. त्यामुळे निश्चित नाराजी काही प्रमाणात आहे. यावर तोडगा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काढतील. नाराजी वाढणे हे चांगले नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर भरवसा ठेऊन शिवसेना आमदार बाहेर पडले. कुणालाही नाराज करणार नाही असा शब्द शिंदेंनी दिला आहे. पक्षाच्या नेत्यांजवळ आमची नाराजी सांगितली आहे. कुठल्याही स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार या २-४ दिवसांत व्हायला हवा. त्यात कुणाचा नंबर लागेल हा अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु या बहुतांश लोकांचा समावेश होईल. आम्ही राष्ट्रवादीविरोधात आधीपासून होतो. आजही शरद पवारांविरोधात आहोत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून मोहरा बनवला. अडीच वर्ष मुख्यमंत्री असून राज्य शरद पवार चालवत होते. मविआ सरकारच्या काळात जो त्रास दिला त्यामुळे आम्ही उठाव केला. राष्ट्रवादीची साथ सोडा असं आम्ही उद्धव ठाकरेंना म्हटलं होते. आता आम्ही सरकार स्थापन केले त्यात ते आलेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच चालेल असंही आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं.
दरम्यान, महाविकास आघाडी टिकणार नाही हे सत्य आहे. २०१४, २०१९ मध्येही राष्ट्रवादी विरोधात राहणार नाही याचा अंदाज आम्हाला आधीपासून होता. अद्याप आम्हाला कोणाचा फोन आला नाही. पुढे काय होईल हे पाहावे लागेल. जो काही निर्णय होईल तो एकनाथ शिंदे घेतील. ज्यांनी उठाव केलाय त्यांना न्याय मिळेल असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.