मुंबई : अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी वितरक म्हणून आठवडाभरात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशिप स्वीकारली आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांत तर महिलांना स्वस्त दरांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे तसेच त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दुहेरी उद्देशाने नुकताच जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाइल अॅपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसांत बचतगटांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच राज्यातील प्रत्येक गावातील किमान एक बचतगट या अॅपवर नोंदणीकृत होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व्यापक प्रयत्न करीत आहे. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर लगेच सॅनिटरी नॅपकिनची प्रत्यक्ष विक्री सुरू केली जाणार आहे.>अस्मिता रथाचे स्वागतमासिक पाळीविषयक विविध अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांतून सध्या २ अस्मिता रथ फिरत असून मुली आणि महिलांनी अस्मिता रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्यात येत आहे.<महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन वापराचे प्रमाण सध्या फक्त १७ टक्के इतके आहे. पहिल्या वर्षात ग्रामीण भागात हे प्रमाण ७० टक्के इतके करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.- पंकजा मुंडे(मंत्री, महिला व बालकल्याण)
२ हजार गावांत पोहोचली ‘अस्मिता’, २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 5:15 AM