कोरेगाव मूळ : यावर्षीही आरटीईअंतर्गत येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी पालकांना नाहक त्रास होत आहे. मदत केंद्रांमधून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला गरजेचा असल्याचे सांगून माघारी पाठवले जात आहे. काही ठिकाणी मदत केंद्रांमध्ये मदतनीस नसल्याने वंचित घटकातील पालकांना अर्ज करता येत नाही. प्रवेशासाठी अर्ज भरताना जेव्हा पत्ता भरला जातो तेव्हा गुगल मॅपद्वारे अंतर मोजण्याचा प्रयत्न केला जातो. त्या वेळी पत्त्यानुसार घर मॅपवर दाखविले जात नाही. त्यामुळे अर्ज पुढे भरताच येत नाही. आपल्या घरापासून जवळ असलेल्या शाळा या कारणाने दिसत नाही, असे चित्र दिसून येत आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी होत नसल्यामुळे प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असूनही, मदत केंद्रांमध्ये अर्ज भरून न घेणे, जुना हेल्पलाइन क्रमांक, शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसणे आणि विभागवार नकाशा नसल्यामुळे अर्ज करण्यासाठी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालकांनी सांगितले. आरटीईअंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हा, शहर अशा सर्व ठिकाणी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन केंद्रे जाहीर केली होती. याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर दिली आहे. त्याचबरोबर लागणारी कागदपत्रे, तसेच सर्व माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यानुसार प्रत्येक मार्गदर्शन केंद्र, प्रत्येक जिल्हास्तरीय केंद्राचे हेल्पलाइन क्रमांक दिलेले आहेत. यंदा नवीन नियमानुसार अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे लागणार नाहीत. ती मुलांच्या प्रवेशाच्या वेळेस लागणार आहेत, असा नियम असूनही बऱ्याच ठिकाणी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे लागतील, असे सांगण्यात येते. (वार्ताहर)
आरटीईअंतर्गत प्रवेश त्रासदायक
By admin | Published: March 03, 2017 1:23 AM