महागाव : लग्न समारंभासाठी जाणार्या एका परिवाराच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी व मुलगी जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ जिल्ह्यातील महागावजवळ रविवारी सकाळी ८.४५ वाजता घडला. ट्रकने दुचाकीला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. संतप्त जमावाने पळून जाणार्या ट्रकची तोडफोड केली. दिगांबर येसाजी पाटे (३६), पत्नी सविता दिगांबर पाटे (३२), मुलगी गायत्री दिगांबर पाटे (१०) रा. कासारबेहळ ता. महागाव असे मृतांची नावे आहे. तर राहुल दिगांबर पाटे (७) हा या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तालुक्यातील कासारबेहळ येथील दिगांबर पाटे आपल्या परिवारासह एका लग्नसमारंभासाठी धारमोहा येथे जात होते. दुचाकी एम.एच.२९-एफ-९१४५ वर पत्नी सविता, मुलगी गायत्री, मुलगा राहूल असे चौघे जात होते. महागाव जवळील एका वळणावर समोरुन येणार्या भरधाव ट्रक एम.एच.३४-एम-९४६७ ने दुचाकीला जबर धडक दिली. पत्नी सविता ट्रकच्या खाली आली. मुलीच्या पायावरून चाक गेले तर दिगांबर फेकला गेला. तसेच मुलगाही दूर फेकला गेला. पती-पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकमध्ये अडकलेली दुचाकी एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेली. अपघात झाल्याचे माहीत होताच शेकडो नागरिक घटनास्थळी धडकले. रक्तामासाच्या सड्यात पडलेले मृतदेह पाहून प्रत्येकाचे हृदय हेलावून जात होते. दरम्यान काही नागरिकांनी ट्रकला अडवून त्याची तोडफोड केली. मात्र ट्रक चालक पसार होण्यात यशस्वी झाला. दिगांबर हा घरचा कमावता तरुण होता. चार भावात तो सर्वाम मोठा होता. त्याच्याकडे सहा एकर जमीन असून त्याच्याच भरोश्यावर कुटुंब होते. लग्न समारंभासाठी जात असताना काळाने त्याच्या झडप घातली. लग्नसमारंभात या अपघाताची माहिती होताच प्रत्येक जण हळहळताना दिसत होते. (तालुका प्रतिनिधी)
अपघातात पती-पत्नीसह मुलगी ठार
By admin | Published: May 12, 2014 12:32 AM