नंडोरे : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून या अंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाला २ लाखाचे विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.महाराष्ट्र सरकारने २००५-०६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात वीमा योजना सुरू केली. २००९-२०१० पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. या अंतर्गत १ लाखाचे विमा संरक्षण दिले जात होते. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने २०१५-१६ पासून या योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे नवीन नाव देण्यात आले. मात्र त्याचवेळी अपघातग्रस्त शेतकरी किंवा कुटुंबाला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले. या अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख इतकी नुकसान भरपाई त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही संस्थेने वीमा कंपन्याकडे स्वतंत्र्यरित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज असणार नाही हे या योजनेचे वैशिष्ट्य असतील. किंबहुना अशाप्रकारे शेतकऱ्याने आधीच वीमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नसून या योजनेअंतर्गत मिळणरे लाभ स्वतंत्र असतील. शेतीव्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वीजेचा शॉक, इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातासह रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणाऱ्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्याला किंवा त्यांच्या कुटुंबीयाला आर्थिक दिलासा देण्याकरीता शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. कृषी विभागाने या योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून बजाज कॅपीटल इन्शुअरन्स ब्रोकिंम लि. तसेच विमा कंपनी म्हणून नॅशनल इन्शुअरन्स कंपनीकडे ही जबाबदारी सोपविली आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच
By admin | Published: March 11, 2016 2:24 AM