आवाशी/खेड (जि. रत्नागिरी) : लोटे (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या कंपनीत शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास स्फोट होऊन चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोघे जण चिपळूणमधील, एक बीडमधील, तर एक औरंगाबादमधील आहे. कंपनीने मृतांच्या नातेवाइकांना ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या स्फोटामुळे आसपासच्या लाेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घरडा केमिकल्सच्या प्लांट नं. ७ बी येथे हा अपघात घडला. मटेरिअल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरचे तापमान वाढल्याने स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटामुळे मोठी आग लागली. त्यात तेथेच काम करणारे कनिष्ठ उत्पादन अधिकारी बाळासाहेब रामचंद्र गाढवे (४९, खेर्डी, माळवाडी, चिपळूण), मेंटेनस विभागाचे फिटर म्हणून काम करणारे महेश महादेव कासार (२६, भरणे, खेड, मूळ बीड) व उपव्यवस्थापक राजेश फकिरा मानदकर(३९, घरडा कॉलनी, पीरलोटे, मूळ औरंगाबाद) या तिघांचा होरपळून मृत्यू झाला. जवळच असलेले संशोधन अधिकारी आशिष चंद्रकांत गोगावले (३१, भागाडी-शिरळ, चिपळूण) आणि अभिजीत सुरेश तावडे हे दोघ जण गंभीर जखमी झाले. गोगावले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तावडे यांच्यावर ऐरोलीच्या नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिवसेना आमदार भास्कर जाधव, यांनी घटनास्थळी पाहणी केली.