पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीमुळे अनेकदा झालेल्या अपघातामध्ये स्थानिकांचे बळी गेले आहेत. अशाच प्रकारचा अपघात रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ट्रेलर आणि विक्रम मिनीडोरच्या अपघातात पेणच्या कामार्ली गावाच्या सासरे-जावयाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास हा अपघात झाला. कामार्ली गावातून सुरेश मुसळे (५८) व सचिन पाटील (२८) हे सासरे - जावई वृक्षलागवडीसाठी झाडे आणण्यासाठी रविवार सुटीचा दिवस असल्याने पनवेल ताराबारपाडा येथील कर्नाळा अभयारण्यात असलेल्या नर्सरी फार्महाऊसकडे जात होते. यावेळी महामार्गावरील हमरापूर फाट्यावर आले असता पनवेल बाजूकडून भरधाव येणारा ट्रेलर नं. एमएच ४३ जी ११७७ च्या चालकाने विक्रम मिनीडोर नं. एमएच ०६ जे १८४५ हिला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन पाटील हे जागीच ठार झाले, तर सुरेश मुसळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पेण ग्रामीण रुग्णालयातून एमजीएम रुग्णालय कामोठे येथे तातडीने नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर जखमीमध्ये खारसापोली पेण गावचे प्रसाद पाटील (३५) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मयत सुरेश मुसळे हे बँक आॅफ इंडिया पेण शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात
By admin | Published: June 27, 2016 2:08 AM