पंचवटी : सिन्नर-शिर्डी मार्गावर इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.११) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने पंचवटीतील दत्तनगर येथे राहाणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मायलेकांवर अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावीजवळील माळवाडी फाट्यानजीक शर्वरी लॉन्ससमोर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात पंचवटीतील सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०) व त्यांचा मुलगा वैभव अशोक कुलकर्णी (३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुलकर्णी हे मूळचे वावी येथील रहिवासी असून ते पंचवटीत वास्तव्यास होते. वैभव हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता तर दहा वर्षापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. तो एचडीएफसी बँकेच्या वसूली विभागात कामास होता. मायलेकांच्या या मृत्यूने तीन बहिणी पोरक्या झाल्या आहेत.
कुलकर्णी कुटुंबीयांची वावीजवळील माळवाडी(फुलेनगर) येथे शेतजमीन आहे. कुलकर्णी कुटुंबीयातील मायलेक अधून मधून शेतीवर जात असत. रविवारी सकाळी कुलकर्णी मायलेक दुचाकीवरून माळवाडी फुलेनगरला जाताना वावीजवळील फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूंची वार्ता कळताच सर्वांनाच धक्का बसला.
अपघातांची मालिकातीन दिवसांपूर्वी सिन्नर मार्गावर झालेल्या अपघातात सिडकोतील पाच विद्यार्थ्यावर काळाने झडप घातली होती. याच मार्गावर लागोपाठ झालेल्या दुसऱ्या घटनेने मायलेकांना जीव गमवावा लागला. गेल्या आठ तारखेला बस जळून अपघात घडला होता.
आई आणि भाऊ गेल्याने बहिणी झाल्या पोरक्यावैभव यांना तीन बहिणी असून त्यातील दोघींचा विवाह झालेला आहे. त्यामुळे अविवाहित असलेली बहीण पोरकी झाली आहे. एकाच दिवशी आई आणि भाऊ हरपल्याने तिला दुःख अनावर झाले. मयत सुवर्णा कुलकर्णी यांच्या ९१ वर्षांच्या आईची जबाबदारी देखील आता बहिणीवर आली आहे. आजींना आपली लेक आणि नातू गेल्याची कल्पना देण्यात आलेली नाही. वर्षभरापूर्वी त्यांच्या ५७ वर्षांच्या मुलाचा कोरोनात मृत्यू झाल्याचे देखील त्यांना अद्यापही माहिती नाही.
मायलेकांवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कारएकाच दिवशी दोघांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारच्या सुमारास दोघांचेही मृतदेह आल्यानंतर संपूर्ण परिसर सुन्न झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. कुलकर्णी कुटुंबातील बहिणींना अश्रू अनावर झाले. नाशिक अमरधाममध्ये मृतांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मायलेकांच्या मृतदेहांना शेजारी शेजारीच अग्निडाग देण्यात आला असता अंत्यसंस्कारासाठी आलेले सारेच गहिवरले.