ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 5 - लग्न सोहळ्याचा बस्ता खरेदी करण्यासाठी रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील दरोडे कुटुंबीय स्कार्पिओ जीपने पुण्याला गेले होते. दरम्यान, रविवारी गावाकडे परत येत असताना कुर्डूवाडी नजिक पिंपरी पाटीजवळ समोरून भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात नियोजित वधू ममता जनक दरोडे (२६) गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली. अन्य चार जण गंभीर जखमी, तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील ममता दरोडे या मुलीचा हरंगुळ येथील पाहुण्यातील एका मुलाशी विवाह जुळविण्यात आला होता. या विवाहाची दोन्हीही घरी तयारी सुरू होती. पुणे येथून बस्ता बांधावा आणि नवरदेवाचे कपडेही खरेदी करावेत, असा बेत दरोडे कुटुंबाने केला. त्यासाठी त्यांनी स्कार्पिओ जीप घेऊन शुक्रवारी रात्री पुण्याला निघाले. शनिवारी दिवसभर लग्न सोहळ्यासाठी लागणाºया बस्ता आणि इतर कपड्यांची खरेदी केली. शनिवारी रात्री दरोडे कुटुंबीय जीप (क्र. एमएच ०६ - १४२७) ने गावाकडे निघाले. रविवारी पहाटे कुर्डूवाडीनजिकच्या पिंपरी पाटी येथे या जीपला बार्शीकडून पुण्याकडे भाजीपाला घेऊन निघालेल्या भरधाव टेम्पो (एमएच २९ टी ६८२१) ने समोरून जोराची धडक दिली. यामध्ये नियोजित वधू ममता जनक दरोडे ही जागीच ठार झाली. या अपघातात आई मीराबाई जनक दरोडे, बहीण अमृता दरोडे, भाऊ अजित दरोडे (रा. पोहरेगाव), श्रीपाल अशोक बस्तापुरे (रा. रेणापूर) आणि जीपचालक मधुकर धोंडीराम मुसणे (रा. पोहरेगाव) यांच्यासह अन्य एक जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी बार्शी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
२३ दिवसांवर होता विवाह सोहळा...
येत्या २८ फेब्रुवारी रोजी ममताचा हरंगुळ येथील नात्यातीलच मुलाशी विवाह जुळविण्यात आला होता. या सोहळ्याचा आनंद दोन्ही घरांत होता. दोन्ही कुटुंबांकडून याची तयारी सुरू होती. पुणे येथे चांगले कपडे मिळतात, यासाठी दरोडे कुटुंबीय पुण्याला गेले होते. मात्र लग्न सोहळ्याच्या २३ दिवसांपूर्वीच ममतावर काळाने झडप घातली.