नाशिक : जुन्या नाशकातील जुन्या तांबट गल्लीमधील काळेवाडा रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत माती-विटांच्या ढिगाऱ्याखाली काळे कुटुंबीयांसह एकूण पाच नागरिक दाबले गेले. पाच तासांच्या बचावकार्यानंतर सर्वांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. यामध्ये करण राजेश घोडके (२०), समर्थ संजय काळे (२१) या दोघा युवकांचा मृत्यू झाला. एका युवतीसह दोन पुरुष गंभीर जखमी आहे.
कोसळलेल्या वाड्यापर्यंत जाण्यासाठी त्या वाड्यामधील एकमेव वाट होती. त्यामुळे पर्यायी वाटेने जात बचावकार्याला सुरुवात केली. दीड तासात तीन लोकांना बाहेर काढण्यास जवानांना यश आले. पुढील अडीच तासांत उर्वरित दोघांना जवानांनी बाहेर काढले. सर्व रहिवाशांना तत्काळ रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत संजय काळे (६०), काजल काळे (२०), चेतन पवार (२२) हे तिघे गंभीर जखमी झाले. करण, समर्थच्या मेंदूला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. दोघा तरुणांच्या मृत्यूने जुन्या नाशकात शोककळा पसरली आहे.अरुंद गल्लीबोळांमुळे अडथळाकोसळलेल्या वाड्याच्या चौहोबाजूंनी दाट लोकवस्ती, अरुंद गल्ली असल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण झाला. शेजारील बंद वाड्याचे कुलूप स्थानिक व्यावसायिक रियाज तांबट यांच्या मदतीने गॅस कटरच्या सहाय्याने कापले. त्यानंतर वाड्यातून जवान अत्याधुनिक यंत्रे घेऊन आतमध्ये कोसळलेल्या वाड्याच्या ढिगाºयाजवळ पोहचले. ढिगा-याखाली पाच जण अडकल्याची खात्री बचाव पथकाला पटली. तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करत ढिगा-याखाली अडकलेल्या रहिवाशांना एक -एक करून बाहेर काढण्यास सुरुवात केली.गिरीश महाजन, राधाकृष्णन् बी. यांचे मार्गदर्शनवाडा कोसळला असून ढिगा-याखाली पाच रहिवासी अडकल्याची गंभीर वार्ता शहरात वाºयासारखी पसरली. जलद प्रतिसाद पथक, अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्याला तत्काळ सुरुवात केली. दुपारच्या सुमारास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे घटनास्थळी दाखल झाले. महाजन, मुंढे यांनी बचाव पथकाला मार्गदर्शन करत ढिगाºयाखाली दाबल्या गेलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच वाड्याच्या परिसरात राज्य शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणाºया (१०८) दोन रुग्णवाहिका, खासगी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. जखमींना तत्काळ स्ट्रेचरवरून बाहेर आणून रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले.