ऑनलाइन लोकमत,लातूर, दि. 23- देवदर्शनाहून गावाकडे परतणाऱ्या एका कारचा आणि लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लातूर-औसा रोडवरील आलमला रोड येथे भीषण अपघात झाला. यात बाप-लेकीसह एक महिला ठार झाली असून, चौघे जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. राजेश नामदेव पंडगे (वय ४०), समृद्धी राजेश पंडगे (वय ९, दोघेही रा. सिंधगाव, ता. रेणापूर), मीरा व्यंकट नागिमे (वय ४५, रा. महाळंग्रा, ता. चाकूर) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. नांदेड येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन ट्रॅव्हल्स (एमएच १० एडब्ल्यू ५९७५) ही सांगली जिल्ह्यातील विटा गावाकडे सोमवारी पहाटे जात होती. दरम्यान, पंढरपूरचे देवदर्शन आटोपून पंडगे व नागिमे कुटुंबिय कार (एमएच २४ एएफ ४२३८) मधून लातूरकडे परतत होते. ही कार औसा-लातूर रस्त्यावरील आलमला रोडनजिक पोहोचली असता ट्रॅव्हल्स आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात कारमधील राजेश पंडगे, समृद्धी पंडगे, मीरा नागिमे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सरिता राजेश पंडगे (वय ३२), प्रणव राजेश पंडगे (वय १३, रा. सिंधगाव, ता. रेणापूर), अनुसया नाथराव उगिले (वय ७०, रा. तळणी मोहगाव) व राहुल व्यंकट नागिमे (वय २५, रा. महाळंग्रा ता. चाकूर) हे चौघे जखमी झाले. यातील दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे औसा पोलिसांनी सांगितले. औसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक इसाक बाबु जमादार (रा. बेदवडे, ता. खानापूर) यास ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एस.टी. राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल महाबोले, पोलिस निरीक्षक विकास जाधव, सपोनि. शितोळे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत झालेल्या तिघांचेही शवविच्छेदन औसा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. आठवडाभरात पाच जणांचा बळी... औसा-लातूर रस्त्यावरील आलमला मोड परिसर हा मृत्यूचा सापळा बनला आहे. आठवडाभरात झालेल्या दोन अपघातात पाच जणांचा बळी गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघात होत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.
देवदर्शनाहून परतताना अपघात; बाप-लेकीसह महिला ठार
By admin | Published: May 23, 2016 4:23 PM