मुंबई : धावती लोकल पकडण्याच्या नादात अभिनेता प्रफुल्ल भालेराव (वय २२) याला प्राण गमवावे लागले. मालाड स्थानकात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्याच्या पश्चात वडील कैलास भालेराव आणि नातेवाईक आहेत.मालाड येथील कॉल सेंटरमध्ये प्रफुल्ल रात्रपाळीत काम करत होता. मालाड स्थानकावर फलाट क्रमांक २ वरून सोमवारी पहाटे ४ वाजून १६ मिनिटांनी चर्चगेटला जाणारी लोकल आली. लोकल स्थानकावरून सुटल्यानंतर प्रफुल्लने ती पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी ट्रेनच्या खांबावरील हात निसटून तोल गेल्यामुळे, चर्चगेट दिशेला असलेल्या फलाटाच्या शेवटच्या सिग्नल खांबावर तो फेकला गेला आणि मृत्युमुखी पडला. त्याच्या मोबाइलवरून रेल्वे पोलिसांनी ओळख पटविली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती बोरीवली रेल्वे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धीवार यांनी दिली.‘कुंकू’मधील भूमिका लोकप्रिय-काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ चित्रपटात प्रफुल्ल दिसला होता. त्याला खरी प्रसिद्धी मिळाली होती ती ‘कुंकू’ या मालिकेमुळे. ‘कुंकू’ या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या जानकीचा भाऊ म्हणून त्याने काम केले होते. या मालिकेत त्याने साकारलेल्या गण्याची भूमिका लोकप्रिय ठरली. याशिवाय ‘तू माझा सांगाती’, ‘नकुशी’ या मालिकेतील त्याच्या भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या.
अभिनेता प्रफुल्ल भालेरावचा अपघाती मृत्यू , धावती लोकल पकडणे बेतले जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 4:09 AM